त्यांचे लॉकडाऊन्
"बरा लिहितोस तू, पण फार जड आणि गंभीर विषय घेतोस. मागे पण ' रेलिवेन्स ऑफ कॉमन सेन्स' असा काही लेख लिहिलास, पण काही रेलीवन्स च लागला नाही लोकांना.काहीतरी हलकंफुलकं लिही,मग बघ कसे खचाखच व्ह्यू ज आणि टपाटप लाईक्स मिळतील." असे समिक्षकाच्या थाटात सांगत, व्हॉट्स ऍप फॉरवर्ड आणि फेसबुक पोस्ट्स यापुढे वाचनाचा जास्त त्रास न घेणाऱ्या माझ्या मित्राची प्रेमळ सूचना ऐकून मी जरा विचारात पडलो.
आता हलकं फुलकं काय लिहावे बर ?या विचाराने डोकं जड व्हायला लागले.
परवा संध्याकाळचा फेरफटका मारताना बायकोचे बाकी स्त्री वर्गा बरोबरचे " शूटिंग ला परवानगी दिलेय वाटतं, आता मालिका चालू होतील ना? " हा संवाद उडत उडत ऐकला आणि २ महिने थांबलेला छळवाद लवकरच परत सुरू होतोय ?काय अशी शंका मनाला चाटून गेली.
यायला ह्या मालिकेतल्या पात्रांचे बरे, लॉक डाऊन नाही की quarntine नाही. झाडून सगळे सण साजरे करणाऱ्या या मालिकांसारखा सर्वधर्म समभाव बाकी कुठे दिसत नाही. मग लॉक डाऊन दाखवायला काय झाले यांना. खर तर यांच्यावर कायमचे लॉक डाऊन लागून हा दररोज चा छळवाद संपवा ही अंत्यस्थ इच्छा. पण ही इच्छा काही पूर्ण होती की नाही माहीत नाही पण " या पात्रांचे मालिकेमध्ये खरेच लॉक डाऊन झाले तर!!" अचानक हलके वाटायला लागले आणि आहे की हा हलकाफुलका विषय , या काल्पनिक पात्रांची लॉक डाऊन ची मज्जा लिहिताना आपल्या कल्पना शक्तीची पण परीक्षा घेता येईल असे वाटल्यावर "युरेका " नाही पण " युरेका % १० " असे फिलिंग आले.
तसा शालेय जीवनात " मी पंतप्रधान झालो तर" , " मला लॉटरी लागली तर" असले जर.. तर वाले निबंध लिहिण्याचा फुटकळ अनुभव पाठीशी होताच. मग जबरदस्तीने पाहायला लागलेल्या या मालिका आणि त्यातल्या पात्रांवर कल्पनेत का होईना नक्की सुड उगवता येईल असा राक्षसी विचार मनात डोकावला.
लॉक डाऊन पूर्वी फेसबुक, मिम्स मध्ये प्रसिद्ध/ चर्चेत असलेली पात्रे अचानक कोरोना महात्म्य वाढल्यामुळे अडगळीत पडली होती.
लॉक डाऊन आधी राधिका ची ३०० कोटीची कंपनी जागतिक मीम्स चा भाग होती म्हणे. मधे कोणीतरी घरोघरी तयार होवू घातलेल्या " ब ब डू " वर फेसबुक वर लेख लिहिल्याचे अस्मादिकां च्या स्मरणात होते.
मग आता लोकांना राधिका,गुरुनाथ , अण्णा, शेवंता ह्यांचे लॉक डाऊन कसे असेल याचा साधा विचार ही शिवला नाही कसा बरे. माणूस मुळातच " गरज सरो वैद्य मरो" या स्वभावाचा आहे हे परत एकदा सिद्ध झाले ( आता कोरोना योध्यांच्या बाबतीत असे वागू नये म्हणजे झाले).. गेला बाजार त्यावर मीम्स टाकावेत. ते ही नाही म्हणजे अतीच झाले.
बिचाऱ्या रधिकाची कंपनी लॉक डाऊन मुले 300 कोटी वरून 200 कोटी वर आली असणार तिचे तिला केवढे टेन्शन आले असणार किंवा
कदाचित जगभरात घरोघरी पदार्थ बनवण्याची चढाओढ चालू असताना तिची कंपनी 400 कोटींची पण झाली असेल.( यात कोठेही अतिशयोक्ती नाही. १ वर्षात ३०० कोटी होवू शकतात मग पुढचे १०० कोटी किस झाड की पत्ती. या वेगाने तर अलीबाबा, अमेझॉन पण वाढत नाही.)
सीईओ राधिकाने स्वतः च्या कंपनीचे मसाले वापरून सौमित्र आणि फॅमिली ला नवनवीन पदार्थ खायला घालून वैताग आणला असणार. नाहीतरी ही बाई सीईओ असून घरच्या भानगडीत जास्त गुंतलेली असते आणि आमच्या सारख्या सामान्य माणसाला नोकरी सांभाळताना नाकी नवू येते.
इकडे गुरुनाथ आणि कंपनी, शनाया च्या हातची मॅगी खावून कंटाळली असणार. शनायाशी लफड करताना दोन वेळेची खायची भ्रांत होईल हा विचार त्याने आधी केला नसणार. एकतर मॅगी करायची आणि भांडी पण आपल्याच बोडक्यावर या विचारातून त्याने " केडया शी" संधान साधून राधिकाशी परत कसे जुळवता येईल याचे डावपेच आखले असणार.
केड्या आणि शानाया कुठे फुकट जेवण वाटत आहेत यावर लक्ष ठेवून रांगेत मास्क लावून उभे राहीले असणार.
लॉक डाऊन मधला सगळ्यात सुखी प्राणी म्हणजे असावरीचा लाडका " ब ब डू" कारण याच्या आयुष्यात लॉक डाऊन मूळे काडीचाही फरक पडला नसणार.
असेही कामधंदा न करता तंगड्या वर करून मोबाईल वर गेम खेळणे आणि फक्त खायला उठणे हाच त्याचा आधीचा दिनक्रम होताच. कामधंदा सोडाच हा आधी कधीही किराणा/ भाजी आणायला गेलेला दिसला नाही तर लॉक डाऊन मध्ये हा कधी हलणार. त्यामुळे याला पोलिसांचे फटके मिळण्याची शक्यता तशी कमीच.वर आसावरी लॉक डाऊन मूळे माहेरी अडकली असली तर याच्यासाठी दुधात साखर. या लाडोबाचे अजुन फावले असणार. इकडे आमची बायको / आई आम्हाला कामाला लावत लॉक डाऊन स्वतःचे लॉक डाऊन सुसह्य करत होते.
बिचारे अभिजित राजे " अभिज किचन " बंद करून मी असावरिशी लग्न केले का की मी एकटाच आहे" याच भ्रमात दिवसभर असणार.
कदाचित आपली ओळख वापरून असावरीला तिकडेच माहेरी अडकवून ठेवले असणार. असेही आसावरिशी लग्न करून " एकटा जीव सदाशिव" असलेली परिस्थिती लॉक डाऊन मध्ये सुरूच राहिली असणार.
यात लॉक डाऊन ला न जुमान नारे अण्णा एकदम वेगळे. म्हणजे मालिकेमध्ये ५-६ खून पचवून कलम ३०२ त्यांचे काही वाकडे करू शकले नाही तर १४४, संचारबंदी चे किरकोळ कायदे अण्णाचे काय वाकडे करणार?
जर नाक्यावरच्या पोलिसाने अडवले तर २ नल्यांची बंदूक दाखवून अण्णा इच्छित स्थळ गाठत असणार. बाकी "ई पास " वैगेरे आपल्यासारख्या क्षुद्र लोकांना.
अण्णांना बाकी तळीराम न सारखा स्टॉक करायची गरज पडली नसणार. ते जमावबंदी चा आदेश झुगारून आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर " सोशल दिस्तींसिंगचा " फज्जा उडवत बाटलीतले पांढरे द्रव्य पीवून रोज घरी झुलत जात असणार.
पोलिसांनी अण्णा ना शेवंता च्या घरी जायचा परवाना " जीवनावश्यक सेवा" या सदराखाली देवून टाकला असणार.
धन्य ती पात्रे आणि धन्य ते लेखक.
अशी आणि अश्या सारखी बरीच पात्रे माझ्या भोवती लॉक डाऊन कथा घेवून फिरू लागली आहेत पण विस्तार भयास्तव थांबतो.
खरेतर सगळ्या भोंगळ डेली सोप्स आणि त्यातल्या पात्रांवर वर कायमचे लॉक डाऊन लागून ती गायब व्हावीत आणि पुढील छळवाद थांबावा ही इच्छा कधी पूर्ण होईल हे देवाला माहीत. पण तूर्तास हा लेखनप्रपंच करून मी थो डातरी सूड उगवला याचे समाधान.
टीप - इच्छुकांनी आप आपल्या आवडीच्या हिंदी/ मराठी मालिका , वेब सीरिज आणि त्यातील आवडती पात्रे यांच्या लॉक डाऊन चा खुशाल कल्पना विलास करावा. त्यानिमित्ताने आपल्या कल्पना शक्तीची पण परीक्षा होवून जाईल.
© अभिजित गायकवाड.
ConversionConversion EmoticonEmoticon