आत्ता डोसे बनवुन त्यावर ताव मारला आणि आंथरुणात मस्तपैकी हेडफोन टाकून आलेले विडिओ बघत पहुडलो होतो.
तेवढ्यात आतून बाबा आले.
"अरे कलिंगड़ काप की. फ्रिज मधे ठेवलय."
त्यांच्या ह्या वाक्याने मगाशी फिजमधे असणारे जिन्नस आज बाहेर डायनिंग टेबल वर का ठेवले होते हे माझ्या लक्षात आलं. अर्थात ते आत ठेवण्याची तसदी मी न घेतल्याने मला त्यात कलिंगड़ असेल याची कल्पना आली नाही
आत्ता विडिओ बघत असल्याने आणि ते बघण्यासारखे असल्याने 😝 मला कलिंगड़ कापायची अजिबात घाई नव्हती.
तरीही पिताश्री तिथून परत आतल्या खोलीत जावेत म्हणून मी
"कापतो नंतर." असे उत्तर दिले.
"कापणारच आहेस तर लवकर काप की. म्हणजे आम्हीही खाऊन झोपु ना" बाबांच्या ह्या वाक्याने मला मनात नसुनही लगेच उठावे लागणार होते.
मी लगेच उठलो आणि आत स्वयंपाकघरात गेलो.
सूरी, सालिंना परात आणि खायला डिश ,काटे चमचे, मीठ वगैरे साग्रसंगीत घेऊन माजघरात आलो. परत आत जाऊन फ्रिज उघडला.
आणि त्या प्रचंड मोठ्या, हिरव्यागार, गरगरीत कलिंगडावर माझी नजर स्थिरावली. त्याच्या विशालतेकडे बघितल्यावर त्याच्या नावात 'गड़' ह्या शब्दाची जोड़णी का झाली असावी याची मला उकल झाली.
ते भारदस्त वजनी फळ घेवून मी गडकरी असल्याच्या आविर्भावात माजघरात आलो. आता ह्या गडाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी खुद्द महाराजांनी माझ्यावर सोपावली होती याचा मला अभिमान तर होताच पण जबाबदारीची जाणीव देखील होती. तरीही कर्तव्य परायण असणारा हां सरदार ह्या गडावर तुटून पडणार होता.
सूरी पाजळली. हातात गडाचा कब्जा होता. आणि खस्स!!!!!
झाला. पहिला वार झाला. कर कर करीत आसुसलेले शस्त्राचे पाते त्या गड़कोटात घुसले. गडाचा दरवाजा भेदला गेला. आणि पुढे ह्या गड़कऱ्यामधे मुरारबाजीच् संचारला जणू. कराकर त्या रक्तरंजित रणांगणात हां मर्द मावळा सूरी घेवून अक्षरशः तांडव करु लागला. इंच इंच वार करत त्याने गनिमाचे तुकडे तुकडे केले आणि आत खोलवर लपून बसलेल्या बियारूपि गनीमाना काट्या चमचारूपी भाल्याने टोचुन टोचुन बाहेर काढले.
गड़ सर झाला. विजयी मुद्रेने त्या तुकडे तुकडे केलेल्या रक्तरंजित फोड़ी मी प्लेट मधे घालून तो नजराणा आबासाहेब महाराज आणि आमच्या आउसाहेब यांना पेश केला.
महाराजही ही मोहीम आम्ही मोठ्या हिकमतीने फत्ते केल्याने बेहद खुश होते.
त्यातला काही भाग आम्हाला शाबासकी म्हणून जाहागिर स्वरुपात देण्यात आला आणि इथून पुढे येणारे प्रत्येक कलिंगड़ सर करण्याची मनसब त्यांनी आम्हाला बहाल केली.
आज आम्ही खऱ्या अर्थाने कृतार्थ झालो
ह्या ह्या ह्या
RMV.

2 Comments
Click here for CommentsRahul mane
Replykay re mandya
ReplyConversionConversion EmoticonEmoticon