आम्ही लहान असताना आख्खि नगरपालिका हे आमचे क्रिडांगण होती. वाई नगरपालिका म्हणजे सरदार रास्ते वाड़ा. दुर्दैवाने आगीच्या भक्ष्यस्थानि पडून तिथे आता नवीन आवाढव्य इमारत बांधून झाली. अर्थात उद्घाटन नेहमीप्रमाणे रखडलेले आहेच.
असो त्यात आता पडण्याचे काही प्रयोजन नाही
तर या रास्ते वाडयावर रास्त्यांनंतर जर कोणी मालकी गाजवली असेल तर ती आम्हा गणपति आळीतल्या मुलांनी.
गोट्या, भवरे, क्रिकेट, आबधुबि, लगोरी, लपंडाव, बैडमिंटन, ते अगदी तिथल्याच् एका खोलीत तयार केलेली छोटेखानी जिम. आणि तहान लागली वर नगरपालीकेत असणारा कूलर आणि त्याचे पाणी.
तिथल्या एका खोलीत पोस्टचे कार्यालय पण होते. तिथे तिकीट चिकटवायला खळीचं पातेलं असायचं. पतंग चिकटवण्यासाठी ते हमखास गायब होत असे.
आत बुचाची 4 झाडे होती. गगनचुंबी झाडं पांढर्या फुलांनी बहरलेली असायची. त्याचा सड़ा सगळीकडे पडलेला असे. त्या फुलांची पिपाणि प्रत्येकाच्या तोंडात असायची आणि त्या आवाजाने नगरपालिका कर्मचारी पुरते वैतगायचे. त्या काळात आमचे सवंगडि पुढे बदली, नोकरी निमित्ताने हळूहळू गाव सोडून गेले. कारण पूर्वी वाडे खुप होते आणि भाडेकरु जास्त. त्यामुळे अस्थायी नागरिक खुप असायचे.आता वाड़े नष्ट झाले. अपार्टमेंट झाल्या. स्थानिक लोकहि कायमस्वरूपि रहायला आले पण त्यांच्या मुलांना कधी असे एकत्र खेळताना बागड़ताना मी कधी पाहिले नाही.
आता वाड़ा पडला, मैदान राहिले नाही, आजुबाजुला असणारी मोठमोठी परसं, झाडं राहिली नाहीत. पण मनात विचार येतो की हे सर्व आधुनिकतेच्या नावाखाली जरी लोप पावलं नसतं तरी त्याचा उपभोग घेणारी बालमनं तरी कुठे अस्तित्वात आहेत.
कंप्यूटरवर गेम खेळून जिंकण्याचा आनंद घेणारी आणि डोळ्यावर भिंगांचे चष्मे लावणारी आधुनिक फ्लैट मधली मुलं त्या जुन्या वाड्यातल्या चिंच आणि बुचाच्या झाडावर पतंग काढायला कधी चढली असती का? मग ती झाडं, तो वाड़ा, ते मैदान असलं काय आणि नसलं काय? काय फरक पडतो??
मंदार खरे
ConversionConversion EmoticonEmoticon